अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडप्रकरणी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याला अखेर सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोखरणाची सायंकाळी पावणेआठ वाजेच्या समारास सुटकाही करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे करत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड आयसीयू सेंटरला ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोखरणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान डॉ. सुनील पोखरणा याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता. तो अर्ज मंजुरही झाला होता.
या प्रकरणाची राज्यस्तरीय समितीकडून चौकशी सुरू होती. या समितीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, चाैकशी समितीने पोखरणा याच्यावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे पोखरणाचा सदर गुन्ह्यात समावेश करण्यात आला असून, त्याला सोमवारी चार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यानंतर पावणेआठ वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या आदेशानुसार पोखरणाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पोखरणा याला आरोपी करण्यात आले असल्याचे शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले.
पोखरणा साडेतीन तास पोलीस ठाण्यात
जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे आहे. त्यांच्या आदेशानुसार पोखरणाला सोमवारी चार वाजता पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर पावणेआठ वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची सुटका करण्यात आली.