अहमदनगर - महापौर निवडणुकांमध्ये भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या 4 नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्याही 18 नगरसेवकांचे निलंबन केलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अहमदनगरमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अन् बसपाच्या नगरसेवकांनी भाजपाला मतदान करुन पाठिंबा दिला होता. त्यांनंतर, या दोन्ही पक्षांवर सोशल मीडियातून मोठी टीका करण्यात आली होती.
अहमदनगर महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व बसपा यांच्या पाठिंब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. त्यावेळी शिवसेनेच्या 24 नगरसेवकांपैकी 23 नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सेनेला पाठींबा दिला. सेनेला एकूण 08 मते मिळाली महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. वाकळे यांना 37 मते मिळाली. त्यात भाजपाची 14, राष्ट्रवादीची 18, बसपा 04 व अपक्ष 01 अशा मतांचा समावेश आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर येत्या 4 तारखेला कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे, बसपनंतर आता राष्ट्रवादीचेही निलंबन केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पवार म्हणाले होते, नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक 4 किंवा 5 जानेवारी 2019 होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते.