अहमदनगर : शिक्षण समितीच्या सभेचा गोंधळ शुक्रवारी सभेच्या दिवशीही सुरूच होता. अधिकारी म्हणाले ही सभा झाली, मात्र सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे यांनी सभा झालीच नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सभेत कोणत्या विषयांवर चर्चा झाली व कोणते विषय मंजूर झाले याबाबत काहीही माहिती समजू शकली नाही.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा शुक्रवारी (दि.२६) प्रतिपादन पद्धतीने आयोजित केली होती. प्रारंभीपासूनच या सभेला विरोध होत होता. जिल्हा प्रशासनाने सभेसाठी परवानगी दिली असतानाही सभापती व समितीचे सचिव तथा शिक्षणाधिकारी सदस्यांना आमंत्रित करून सभा का घेत नाहीत, असा आक्षेप सदस्य परजणे व वाकचौरे यांनी घेतला होता. त्यावर समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी आता सदस्यांना निमंत्रण पाठवायला वेळ नाही, त्यामुळे ही सभा प्रतिपादन पद्धतीने होईल, यापुढील सभा मात्र सदस्यांच्या उपस्थितीत घेऊ, असे सांगितले होते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी सदस्य परजणे व वाकचौरे मुख्यालयात आले होते. त्यांनी शिक्षण विभागात सभेबाबत शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याकडे विचारणा केली. सभापती शेळके यांच्याकडेही त्यांनी हिच मागणी केली. परंतु दोघांनीही प्रतिपादन सभा होणार असल्याचे सांगून पुढील सभा जाहीर घेऊ, असाच पुनरूच्चारकेला.
दरम्यान, या सभेत कोणते विषय चर्चेला होते, कोणते मंजूर झाले याची माहितीही पत्रकारांना मिळू शकली नाही. एकूणच दिवसभर या सभेबाबत सावळा गोंधळ दिसून आला.