श्रीगोंदा : तालुक्यातील कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृतावस्थेत आढळले आहेत. या मोरांचा मृत्यू नेमका कशाने झाला असावा हे स्पष्ट होत नसल्याने संशय निर्माण झाला आहे. मोरांचा मृत्यू बर्ड फ्लू की शिकाराची प्रयत्न अशी चर्चा सुरू आहे.
कोकणगाव, आढळगाव परिसरात मोराची संख्या मोठी आहे. अलिकडच्या काळात ओढ्यानाल्यावर अतिक्रमण वाढले. त्यामुळे झाडे-झुडपे कमी झाली आहेत. त्यामुळे मोरांची वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत कोकणगाव शिवारात चार मोरांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिकांवरील विषारी किटकनाशकांमुळे की शिकारीचा प्रयत्न की बर्ड फ्लू हे स्पष्ट झालेले नाही. पशुसंवर्धन, वन विभागाने मोरांच्या मृत्युचे कारण शोधावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.