अहमदनगर : महापौर पदाच्या चर्चेत असलेले भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांच्या तिसऱ्या अपत्याचा जन्म दोन हॉस्पिटलमध्ये झाल्याचे दोन वेगवेगळे पुरावे, समोर आल्याने सगळाच गोंधळ उडाला आहे़ दरम्यान, आपले तिसरे अपत्य नियमानुसार जन्मलेले असून, विरोधकांकडून खोडसाळपणा केला जात आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे वाकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़नगरसेवक वाकळे यांचे तिसरे अपत्य १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांना महापौर पदाची निवडणूक लढविण्यास रोखावे, अशी याचिका वाकळे यांच्या प्रभागातील पराभूत उमेदवार अर्जुनराव बोरुडे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. यापार्श्वभूमीवर वाकळे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, तिसरा मुलगा अजिंक्य याचा जन्म ३ एप्रिल २००१ रोजी वाळकी येथील अमर हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. त्याच्या जन्माची तारीख १२ सप्टेंबर २००१ पूर्वीची आहे. तिसºया अपत्याचा कायदा लागू होण्यापूर्वीच त्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे आपण अपात्र ठरत नाहीत. आपण महापौर पदासाठी इच्छूक आहोत. त्यामुळेच विरोधकांकडून हा खोडसाळपणा केला जात आहे. विरोधकांनी अकोलकर हॉस्पिटलचे जे प्रमाणपत्र मिळविले ते खोटे असल्याचा दावा वाकळे यांनी केला आहे.अमर हॉस्पिटल झाले बंदअमर हॉस्पिटल (वाळकी, ता. नगर) येथे आपले तिसरे अपत्य ३ एप्रिल २००१ रोजी जन्मले असा दावा बाबासाहेब वाकळे यांनी केला आहे. त्याच्या पुराव्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत अमर हॉस्पिटलचे पत्र दिले़ मात्र, हे पत्र कधी वितरीत केले ती दिनांक त्या पत्रावर दिसत नाही. अमर हॉस्पिटल हे सध्या बंद असून, डॉ. हरिष बोठे (बीएस्सी, बीएएमएस) यांचाही मृत्यू झाला आहे. वाकळे यांनी महापालिकेतील आपल्या अपत्याच्या जन्माच्या नोंदीचा दाखलाही पत्रकारांना दिला. मात्र, या दाखल्यावर २१ डिसेंबर २०१८ अशी ताजी तारीख आहे.डॉ. अकोलकर यांच्या दाखल्याचे गौडबंगालडॉ. नानासाहेब अकोलकर यांच्या दवाखान्यात आपले तिसरे अपत्य जन्मलेले नाही, असा बाबासाहेब वाकळे यांचा दावा आहे. आपल्या आपत्याचा जन्म वाळकी (ता. नगर) येथील अमर हॉस्पिटलमध्ये झाला, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान अकोलेकर हॉस्पिटलचे एक पत्र ‘लोकमत’च्या हाती आले असून, यात वाकळे यांच्या तिस-या मुलाचा जन्म १०-१०-२००१ रोजी या हॉस्पिटलमध्ये झाला, असे म्हटलेले आहे़ ही तारीख १२-०९-२००१ नंतरची आहे़ अकोलकर यांनी गत १४ डिसेंबरला हे पत्र दिले आहे़ या पत्रानुसार वाकळे यांचे तिसरे अपत्य विहित मुदतीनंतर जन्मलेले दिसते़ मात्र, सदर पत्र आपण अनावधानाने दिले असल्याचा पवित्रा डॉ़ अकोलकर यांनी घेतला आहे़ त्यामुळे सगळे गौडबंगाल निर्माण झाले आहे़ डॉ़ अनावधानाने असे पत्र कसे देऊ शकतात, याबाबत त्यांनी स्वत: तसेच मेडिकल कौन्सीलनेही अद्याप काहीही खुलासा केलेला नाही़ या गंभीर विषयाबाबत जिल्हा प्रशासनही मौन पाळून आहे़ अशा पद्धतीने किती प्रकरणात चुकीचे दाखले देण्यात आले, हा नवीन घोटाळाही उजेडात येऊ शकतो.
संशयकल्लोळ : वाकळे यांच्या अपत्याच्या जन्म झाला कोेठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:16 AM