वाळकी : फळबागेत मिश्र पीक (आंतरपीक) घेतल्यास वर्षभर शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते. तसा प्रयोग नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ श्रीपती मस्के यांनी केला आहे. यातून ते वर्षभरात पाच लाखांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत.
पंढरीनाथ म्हस्के यांच्याकडे ३५ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी त्यांनी सहा एकर शेत जमिनीवर संत्र्याची फळबाग लावली आहे. संत्र्याच्या झाडांमधील अंतर १७ फूट आहे. त्यात ते मिश्र पिके घेतात. कोबी, वांगी, टोमॅटो, हरभरा, गहू, कांदे, मका, कांद्याचे गोट, मिरची, लसून, घास अशी पिके घेत आहेत. वर्षभर त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे. फळबागेत पट्टा पद्धतीने इतर पिके घेतली आहेत. वर्षभरात खर्चवजा जाता पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शेणखताचा वापर ते बागेसाठी व इतर पिकांसाठी करतात. हे सर्व उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे उत्पादित मालाला भावही चांगला मिळत आहे.
यासाठी मस्के यांचा मुलगा दत्तात्रय, सून मंगल विशेष परिश्रम घेत आहेत. नातू श्रीकांत हाही शिक्षणाबरोबरच आई-वडिलांना शेतातील कामाला मदत करत आहे.
---
फळबागेमध्ये पट्टा पद्धतीने आंतरपिके घेणे फायदेशीर आहे. तसेच पिकास सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो व दर्जेदार उत्पन्न मिळते. अशा दर्जेदार उत्पादित मालाला बाजारभावही चांगला मिळतो व मागणीही जास्त असते.
-दत्तात्रय म्हस्के,
प्रगतशील शेतकरी,
उक्कडगाव
-----
१५ वाळकी पिके
उक्कडगाव (ता. नगर) येथील पंढरीनाथ म्हस्के यांची फळबाग व त्यामध्ये असलेली मिश्र पिके.