Shrigonda Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपच्या उमेदवरांच्या यादीनंतर बंडखोरी होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यांनी बंडखोरीचे निशाण फडकवलं आहे. पक्ष बाहेरुन आलेल्यांनाच उमेदवारी देत असल्याचे म्हणत आपण अपक्ष लढू असे सुवर्णा पाचपुते यांनी म्हटलं आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांना तिकीट दिल्याने सुवर्णा पाचपुते प्रचंड नाराज आहेत. प्रतिभा पाचपुतेंच्या नावाची घोषणा होताच सुवर्णा पाचपुते यांना अश्रू अनावर झाले. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची आहे, असा इशारा सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे. यासोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. दुसरीकडे, बबनराव पाचपुते यांनीही आम्हाला त्यांच्या बंडखोरीचे आव्हान वाटत नसल्याचे म्हटलं आहे.
"लोकांचा मला इतका आधार मिळाला आहे की आज माझ्या डोळ्यात पाणी येतय पण ते खाली येत नाही. याचे कारण माझ्या मागे असलेला लोकांचा पाठिंबा हा आहे. लोक मला सांगत आहेत की कसंही करा आणि उभं राहा. पण मी एक करणार आहे. पक्ष ही माझी विचारधारा होती. लढले तर मी अपक्ष लढेल आणि इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची आहे," असा इशारा सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे.
"मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे. महाभारत होऊ द्या. जनतेचे काहीही होऊ द्या. फक्त आमची सत्ता आली पाहिजे हे पक्षाचे ध्येयधोरण आहे,: असेही सुवर्णा पाचपुते म्हणाल्या.
सुवर्णा पाचपुतेंच्या इशाऱ्यानंतर श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी भाष्य केलं आहे. "आम्हाला त्यांच्या बंडखोरीचे आव्हान वाटत नाही. त्यांनी अपक्ष उभं राहावं," असे प्रत्युत्तर बबनराव पाचपुते यांनी म्हटलं.