लोकमत न्यूज नेटवर्कअकोले : अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये उंच उडी व तिहेरी लांब उडीत ६१ सुवर्णपदकांसह १३२ पदके पटकाविणारी अकोले येथील सुवर्णकन्या श्रध्दा घुले शनिवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाहबध्द झाली. संगमनेर येथे झालेल्या विवाहाला राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसह मान्यवरांनी हजेरी लावून तिला शुभेच्छा दिल्या.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील आय.ए.एस. अधिकारी रवींद्र खताळे यांच्याशी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ कल्बमध्ये हा विवाह मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ््याला विद्यावाचस्पती महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवीतकर, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आ. वैभव पिचड, आ. राजाभाऊ वाजे (सिन्नर), धावपटू ललिता बाबर, जुन्नरच्या विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार माणिकराव कोकाटे (सिन्नर), अॅड. भगिरथ शिंदे, नाशिकचे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धा यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे आजोबा पांडुरंग घुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या ठरलेल्या श्रध्दाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर तिहेरी व उंच उडीत ६३ सुवर्ण,२४ रौप्य ,२७ क ांस्य अशी एकूण ११४ पदके पटकाविली आहेत. महाराष्ट्रातील १८ वर्षे, २० वर्षे व महिला अॅथलेटिक म्हणून उंच व तिहेरी उडी क्रीडा प्रकारात अनेक विक्रमांची नोंद तिच्या नावावर आहे. २००७ साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे विक्रम मोडीत काढत १३.११ मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. २०१४ ला यशवंतराव चव्हाण ‘क्रीडा युवती’ पुरस्काराने, तर महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने तिचा नुकताच गौरव केला आहे. पतियाळा येथे ‘बेस्ट अॅथलेटिक वुमन’ अवॉर्ड तिला प्राप्त झाला आहे.
सुवर्णकन्या श्रध्दा घुले विवाहबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:32 PM