विनोद गोळे ।
पारनेर : तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे.
पिंपरी जलसेन गावात महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व गीतांजली शेळके यांनी ग्रामस्थांना एकत्र करून जलसंधारण चळवळ राबविली. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत हे गाव राज्यात दुसरे आले. याच धर्तीवर गीतांजली शेळके यांनी महिला, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला. अनेकांशी चर्चा केली. त्यातून ग्रामीण महिलांना सोपे ठरणारे आणि यातून उद्योगाला चालना देणारे आहारात पौष्टिक असणाºया थालीपीठासाठी लागणारे ‘पीठ’ तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येकी पाचशे रूपये भांडवलात सुरू झाला उद्योग..गीतांजली शेळके यांनी महिलांना थालीपीठासाठीचे पीठ बनविण्याच्या प्रयोगाबाबत माहिती दिली. त्यांनी थालीपीठ खाताना स्वादिष्ट होण्यासाठी आई रोहिणी माधव देशमुख यांच्याकडून पीठ बनविताना काय-काय पदार्थ कशा पद्धतीने टाकायचे याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वत: महिलांना प्रशिक्षण दिले. मग नवलाई बचत गटाच्या प्रतिभा बोरुडे, राहत पठाण, सोनाली पुणेकर, प्रवीण गायकवाड, वंदना वाढवणे, वृषाली काळे, सविता शिंदे, शबाना शेख, अंजली गाडेकर, सुनीता थोरात, रतन सोनवणे यांनी प्रत्येकी ५०० रूपये जमा करून थालीपीठचे पीठ बनविण्यासाठी धान्य व विविध वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर प्रत्यक्ष पीठ बनविणे सुरू केले. शेळके यांनी प्राथमिक स्तरावर याची पाकिटे पुण्या-मुंबईत दिली. त्याची विक्री होऊन मागणी वाढली. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती सुरू केली.
थालीपीठ पौष्टिक आहार आहे. त्याचे पीठ बनवून विक्री करणे सोपे आहे. त्यामुळे महिला, युवक, युवतींनी राज्यात चौका-चौकात असे थालीपीठ स्टॉल सुरू करावे, असा आमचा प्रयत्न आहे. वडापाव, इडली-डोसा विक्रीच्या धर्तीवर या माध्यमातून राज्यात हजारो जणांना यातून रोजगार मिळेल.-गीतांजली शेळके, प्रमुख, थालीपीठ उद्योग केंद्र