श्रीरामपूर : कोरोना महामारी हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा आरोप करत लाल निशाण पक्षाच्या वतीने सोमवारी पक्ष कार्यालयात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कोरोनाबरोबरच कामगार, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयश आल्याने मोदी सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पक्षाने राज्यभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शने केली. सर्व कार्यकर्त्यांनी घरात, पक्ष कार्यालयात एकत्र येत मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो लोकांना या महामारीत आपला जीव गमवावा लागला. रुग्णालयात बेड, ऑक्सिजनसह मूलभूत औषधे याचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. लसीकरण करण्यातही मोठ्या प्रमाणात प्रचंड गोंधळ होऊन बहुसंख्य नागरिक आजही वंचित राहिले. भविष्यात लस कधी मिळेल याची कसलीही शाश्वती राहिलेली नाही. या महामारीबरोबरच देशातील कामगार-शेतकरी विरोधी कायदे आणून त्यांना गुलामीत लोटण्यात आले.
देशातील सरकारी मालकीचे उद्योग व बँका मूठभर मंडळींना कवडीमोल भावात विकण्याचा एक प्रकारे सपाटाच लावला आहे. त्यामुळे देशाची आर्थिक घडीही पूर्णपणे विस्कळीत झाली असून मोठ्या प्रमाणात देशात बेरोजगारी व महागाई वाढलेली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
या सर्व परिस्थितीला केवळ मोदी सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असून सरकारने तातडीने राजीनामा देण्याची मागणी लाल निशाणचे नेते कॉ. बाळासाहेब सुरूडे यांनी केली आहे. आंदोलनात राजेंद्र बावके, श्रीकृष्ण बडाख, जीवन सुरूडे, शरद संसारे, मदिना शेख,, अमोल लबडे, एल. बी. डांगे, उत्तम माळी, अरुण बर्डे, रामा काकडे सहभागी झाले होते.