कर्जत : भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘त्या’ दोन कार्यकर्त्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन भाजपच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
कुकडीच्या आवर्तनाला कमालीचा उशीर झाला. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पिके व फळबागा जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कुकडी पाणीवाटप सल्लागार समितीवर विविध प्रश्न मांडण्यासाठी श्रीगोंदा येथील एका नेत्याची निवड झाली. आदी प्रश्नांवर सोशल मीडियावर कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आवाज उठविला. याचा राग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांना आला. त्यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. त्यांची वैयक्तिक व कौटुंबिक बदनामी केली. त्यांना धमकावले, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतिलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे, तात्यासाहेब माने, राहुल निंभोरे, महेंद्र धांडे, एकनाथ धोंडे, धनंजय मोरे, सोयब काझी, अमोल आरडे, पांडुरंग भंडारे, सुनील काळे आदी उपस्थित होते.