अहमदनगर : प्राथमिक शिक्षण विभागातील अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलीला ‘आरटीई’ अंतर्गत शाळेत प्रवेश मिळू शकला नाही. मुलगी जर शाळाबाह्य राहिली तर त्यास केवळ या विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विलास सोनवणे या पालकाने शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.सोनवणे हे संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील रहिवाशी असून त्यांनी मुलीच्या प्रवेशासाठी ‘आरटीई’ अंतर्गत प्रस्ताव दिला होता. मात्र, संगमनेरमधील बंद असलेल्या एका इंग्रजी शाळेत त्यांना प्रवेश मिळाला. ही शाळा बंद असून आपल्या मुलीला घराजवळील दुस-या शाळेत प्रवेश मिळवून द्यावा अशी मागणी सोनवणे यांनी गटशिक्षणाधिकारी व जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिका-यांकडे केली होती. मात्र, पत्रव्यवहार व टोलवाटोलवीपलीकडे काहीही कृती अधिका-यांनी केली नाही. अखेर शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी या मुलीला प्रवेश द्या म्हणून आदेश पाठविला. मात्र, त्यानंतरही काहीही कार्यवाही झाली नाही. तोवर मुलीच्या गावाजवळील शाळांतील आरटीई प्रवेशाच्या जागा भरल्या गेल्या.सोनवणे यांनी यासंदर्भात पुन्हा टेमकर यांच्याकडे तक्रार केली आहे. बंद शाळा ‘आरटीई’च्या यादीत दाखविणा-या अधिका-यांवर कारवाई करावी. आपली मुलगी शाळाबाह्य राहिल्यास त्यास केवळ हे अधिकारी जबाबदार असतील. या प्रकरणात प्रचंड मानसिक त्रास झाल्याने आम्ही आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहोत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.राहाता गटशिक्षणाधिका-यांमार्फत तपासणीसंगमनेर तालुक्यातील डॉ. इथापे कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूल ही शाळा सुरु असल्याचा अहवाल तेथील गटशिक्षणाधिका-यांनी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिका-यांना पाठविला आहे. पालकांच्या मते मात्र ही शाळा बंद आहे. त्यामुळे याबाबत वस्तुस्थिती पडताळण्यासाठी आता राहाता येथील गटशिक्षणाधिका-यांना आदेश देण्यात आले आहेत. मागील दोन वर्षाचा शाळेचा निकाल व यावर्षीचा पट तपासण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मुलीला शाळाबाह्य ठेवणा-या शिक्षणाधिका-यांवर कारवाई करा : पालकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:25 PM