अकोले : लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक निष्काळजी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने गाफिल राहू नये. गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणारे, मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट प्रवास करणारे व फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणा-यांवर कारवाई करा. कारवाया झाल्यानंतर लोकांना नियम पाळण्याची सवय होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
अकोले पंचायत समिती सभागृहात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिका-यांसह तालुक्यातील अधिका-यांची बैठक शनिवारी सायंकाळी पार पडली. यात जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी कोविड-१९ संदर्भात साधक सूचना केल्या.
व्दिवेदी म्हणाले, बाहेरगावाहून येत असलेल्यांमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन सर्व अधिका-यांसह नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. कायदा मोडणा-यांवर दंडात्मक कारवाई केल्यास प्रशासनाचा अधिक वचक निर्माण होईल. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनीही सूचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी संजय कदम, विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, उपविभागीय वन अधिकारी रमेश देवखिळे, तहसीलदार मुकेश कांबळे, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पप्रमुख संतोष ठुबे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे, एकात्मिक महिला बालकल्याणच्या अधिकारी आरती गांगुर्डे, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत उपस्थित होते.