नेवासा : नेवासा परिसरात पकडलेल्या रेशनचा गहू व तांदळाची तस्करी करणारा टेम्पो पोलीस ठाण्यात न आणता, तहसीलदार यांच्या ताब्यात न देता परस्पर सोडून दिला. याप्रकरणी टेम्पो सोडणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.
१४ जूनला सायंकाळी सहाच्या दरम्यान उस्थळ दुमाला-नेवासा या मार्गावर रेशनचा गहू व तांदळाची संशयास्पद वाहतूक करणारा टेम्पो तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पकडला. हा टेम्पो तहसील कार्यालयात नेण्याची मागणी केली. या प्रकाराची माहिती नेवासा पोलिसांना समजली. त्यानंतर पोलीसही तेथे आले. टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पो पोलीस ठाण्यात न आणता, तसेच तहसीलदारांच्या ताब्यात न देता परस्पर सोडून दिला. कार्यकर्त्यांना पोलिसांनी चार तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले व खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तडजोड करून टेम्पो सोडला असून, या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू व धरणे आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
---
वाहनाची माहिती तहसीलदारांना कळवून वाहन पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्याबाबत स्टेशन डायरीला नोंदही घेतली आहे. तसेच वाहन चालकाच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विजय करे,
पोलीस निरीक्षक, नेवासा