भेंडा : ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक हिताचे आमूलाग्र बदल झालेले आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य कारभारी गरड यांनी केले.
जिजामाता माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती या विषयावर गरड बोलत होते. व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश साबळे, उपप्राचार्य भाऊसाहेब विधाटे, भारत वाबळे, भाऊसाहेब सावंत, डाॅ. रजनीकांत पुंड आदी उपस्थित होते.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक मंचाऐवजी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय आयोग असा बदल झाला आहे. ग्राहकाने वस्तू, माल, साहित्य कोठेही खरेदी केले असले तरी ग्राहक राहात असलेल्या जिल्ह्यातील ग्राहक आयोगात तक्रार दाखल करता येणार आहे. एखादी वस्तू, साहित्य खराब निघाल्यास उत्पादक, वितरक व विक्रेत्यावर दंडात्मक व कारावाईची तरतूद आहे, असे गरड यांनी सांगितले.
डाॅ. रजनीकांत पुंड म्हणाले, रुग्ण ग्राहकांनी रुग्णालयात दाखल होताना तसेच घरी परतताना सर्व प्रकारच्या सुविधा व फी ची विचारणा करावी. सध्या कोरोनाची साथ असल्याने प्रत्येकाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी करण्याचा आग्रह धरावा.