अहमदनगर : फ्रन्टलाइन वर्कर अशी ओळख असलेल्या पोलिसांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कामाची मोठी जबाबदारी आहे. दिवसागणिक रुग्णांची वाढती संख्या आणि तीव्र उन्हाच्या कडाक्यातही अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर कर्तव्य निभावत आहेत. अशा परिस्थितीत ''बाबा स्वतःची काळजी घ्या'' अशी आर्त विनवणी पोलीस दादांची मुले त्यांना करत आहेत.
जनतेसाठी कर्तव्य निभावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. काहींना जीव गमवावा लागला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतातच अनेकांनी तत्काळ कर्तव्यावर हजर होत योध्यासारखी भूमिका निभावली आहे. संसर्ग होऊ नये यासाठी अनेक पोलिसांनी आपल्या कुटुंबीयांना स्वतःपासून दूर ठेवले आहे. कुटुंबीयांचा जीव मात्र त्यांच्यासाठी तीळतीळ तुटत आहे. मुले पोलीस बाबाला वेळोवेळी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. ''आमचे बाबा रस्त्यावर ड्युटी करतात तेव्हा त्यांना सहकार्य करा'' असे आवाहन पोलिसांच्या मुलांनी नागरिकांना ''लोकमत''च्या माध्यमातून केले आहे.
............
बाबा आम्ही घरी वाट पाहतोयत
कोरोनाकाळत पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. ड्युटीसाठी सतत त्यांना बाहेर राहावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची मोठी काळजी वाटते. अनेक पोलीस कर्मचारी सध्या बाधित होत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभा करावे. ड्युटी करणाऱ्या पोलिसांसाठी इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
-नितीन खंडागळे, अध्यक्ष, पोलीस बॉइज असोसिएशन
.............
बाबा ज्यावेळेस ड्युटी करायला बाहेर जातात तेव्हा खूप काळजी वाटते. अनेकवेळा ड्युटीसाठी त्यांना बाहेरच थांबावे लागते. अशा परिस्थितीत पोलिसांसाठी बाहेर जेवणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित पोलिसांसाठी तत्काळ बेड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
-मंदार लष्कर
..........
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पोलीस रस्त्यावर समाजासाठी ड्युटी करत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचे मनोबल उंचावणे गरजेचे आहे. कुटुंबीय म्हणून आम्हाला सतत त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते. नागरिकांना एक विनंती आहे की, ड्युटी करत असलेल्या पोलिसांना सहकार्य करा, नियमांचे पालन करा. कारण तुमच्यासाठीच ते काम करत आहेत. ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा देणे गरजेचे आहे.
- अपेक्षा परदेशी
......
कोरोनाच्या बंदोबस्ताचा पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात ताण आहे. त्यांना सतत लोकांच्या संपर्कात यावे लागते. अशा परिस्थितीत सतत मनात भय वाटते. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांच्या कुटुंबीयांनाही आवश्यक त्या सुविधा देणे गरजेचे आहे.
-संकेत पवार
.............
कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलीस दलाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जात आहे. सर्वांची कोरोना टेस्ट करून घेतली आहे. कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांसाठी बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. तत्काळ इंजेक्शन उपलब्ध व्हावेत यासाठी पाठपुरावा केला जातो. मास्क व सॅनिटायझर सर्वांना वेळोवेळी पुरविण्यात येते. जनतेनेही पोलीस दलाला सहकार्य करावे.
-बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, पोलीस वेलफेअर व नोडल अधिकारी
...........
जिल्ह्यातील एकूण पोलीस कर्मचारी- २,९२६
अधिकारी- १६२
........
लसीकरण
पहिला डोस घेणारे कर्मचारी -२५२२
दुसरा डोस घेणारे कर्मचारी- १६१३
पहिला डोस घेणारे अधिकारी - १५१
दुसरा डोस देणारे अधिकारी- ११७
........
एकूण बाधित पोलीस कर्मचारी- ७८९
सध्या उपचार सुरू असलेले पोलीस- ११६
एकूण मृत्यू ७