शेवगाव : भारनियमनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवारी महावितरणच्या कार्यालयात ‘कोळसा घ्या, वीज द्या’ असे अभिनव आंदोलन करीत उपकार्यकारी अभियंता रुपाली पवार यांना कोळसा भेट दिला.कोळसा नाही म्हणून भारनियमन केले जाते असे ‘महावितरण’कडून सांगितले जाते. महावितरण कार्यालयाने वर्षभराची वीज निर्मितीची गरज व आपत्कालीन गरज लक्षात घेऊन विशेषत: आॅक्टोबर महिन्यात सुरु होणा-या कृषी ग्राहकांची वीज मागणीची वाढ लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक होते. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे राज्यात भारनियमन करावे लागत आहे. सध्या शालेय परीक्षा, सणांचे दिवस असताना विद्यार्थ्यांबेराबर नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागतो, असे मनसेने उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांना मागणी नुसार वीज पुरवठा करावा, अशी मागणी करीत मनसेच्यावतीने अधिका-यांना कोळशाचा बॉक्स भेट देऊन कोळसा घ्या पण वीज द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली़ येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयात ‘मनसे’ स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, मनविसेचे तालुकाध्यक्ष सतीश मगर, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, शहर उपाध्यक्ष बाळा वाघ, संदीप देशमुख, राजेंद्र साळुंके, मंगेश लोंढे, सुनील काथवटे, दिनेश तेलोरे, कांतीलाल जैस्वाल, महेंद्र घनवट, जालिंदर कवळे, आशितोष शिरसाठ, अक्षय साळुंके, आनंद मगर आदी उपस्थित होते.
कोळसा घ्या, वीज द्या; मनसेचे अभिनव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:32 PM