विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे कोरोना लसीकरणाचे आठवड्यातून किमान एक दिवस शिबिर घ्यावे, अशी मागणी सरपंच उज्ज्वला आढाव यांनी केली आहे.
सारोळा सोमवंशी हे गाव श्रीगोंदा तालुक्यातीच्या शेवटच्या टोकाला पारनेर तालुक्याच्या सीमेवर आहे. येथून पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणच्या वयोवृद्ध नागरिकांना पिंपळगाव पिसा आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यास जाण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात सकाळी ८ वाजता गेले तरी तेथे होणारी गर्दी पाहता लस घेण्यासाठी दुपारचे १२ वाजतात. दुपारी भर उन्हात १० किलोमीटर परत घरी जायचे, कसे हा प्रश्न त्यांना पडतो. कधीकधी पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस उपलब्ध नसेल अथवा लस संपवली तर पुन्हा माघारी फिरण्याची वेळ येते, असे आढाव यांनी म्हटले आहे.