सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखान्यांची चक्रे कोरोना आपत्तीच्या काळातही थांबलेली नाहीत. आपला जीव धोक्यात घालून कामगार कारखान्याच्या उत्पादनात खंड पडू नये यासाठी राबत आहेत. त्यामुळे अशा या आमच्या कामगारांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळायला हवी. त्यासाठी आमच्याकडून पैसे घ्या; पण आमच्या कामगारांना लस द्या, अशी मागणी कारखाना मालक व कारखान्यातील प्रशासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
लसीकरणासाठी लागणारी जागा, वाहनव्यवस्था, येणाऱ्या खर्चाचा भार सांभाळण्याची मानसिकता उद्योजकांची असल्याचे सुपा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी सांगितले.
कामगार गावी निघून गेल्याने, भीतीपोटी कामावर येत नसल्याने ठिकठिकाणच्या कारखानदारीच्या उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. मात्र सुप्यात कामगार कारखान्यात येत आहेत. याबाबत बोलताना घरच्यापेक्षाही सुरक्षित वातावरण कंपनीत असते. तेथे दररोज प्रत्येकाची तपासणी केली जाते. तापमान, ऑक्सिजन लेव्हल पाहून, सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जाते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका राहत नाही. त्यामुळे निश्चितपणे कामगार आत्मविश्वासाने काम करत असल्याचे आम इंडियाचे एचआर संदीप गोखले यांनी सांगितले.
त्यातूनही एखाद्याला लक्षणे दिसू लागली. त्रास होऊ लागला तर तातडीने उपचारासाठी पाठवले जाते, असेही त्यांनी संगितले. आमच्या कंपनीत ४५ वर्षांवरील चाळीसवर कामगार असून, ४५ खालील वयाचे चारशेच्यावर कामगार आहेत. त्यांना लस मिळालेली नाही. सरकारी वा खासगी यंत्रणेमार्फत निर्धारित फी भरून लस मिळण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. सर्वांना सरकारी दवाखान्यात पाठविणे शक्य नसल्याने कंपनीत लस देण्याची सुविधा झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करू, असे पीजी इलेक्ट्रोप्लास्टचे व्यवस्थापक प्रवीण निंबाळकर यांनी सांगितले.
कॅरिअर मायडिया या कारखान्यातील ४५ वर्षांवरील कामगारांना कारखान्याच्या माध्यमातून खासगी दवाखान्यात लसची फी अदा करून लसीकरण करून घेतले. ४५ वर्षांखालील १२५ तरुण आहेत. त्यांना लस देण्यासाठी आमची कंपनी आर्थिक भार सहन करण्यास तयार आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध होणे गरजेचे आहे किंवा सरकारी दवाखान्यात मिळत असेल तर कामगारांना तेथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे कॅरिअर मायडियाचे उपाध्यक्ष (व्ही.पी.) गिरीश चंदर यांनी सांगितले.
---
सुपा एमआयडीसीतील कामगारांना लस मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने संबंधितांकडे मागणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, एमआयडीसी व जिल्हाधिकारी यांनी याबाबत निर्णय घेऊन सर्व कामगारांना लस देण्याबाबत नियोजन करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे.
-अनुराग धूत,
अध्यक्ष, सुपा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशन
---
सुपा एमआयडीसीतील एखाद्या कंपनीत कामगारांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करू. लस कधी व किती प्रमाणात उपलब्ध होतेय याबाबत संबंधितांशी बोलणी करून कामगारांना लवकरात लवकर लस देण्याबाबत नियोजन करू.
- नितीन गवळी,
विभागीय अधिकारी, एमआयडीसी, नाशिक
---
सुपा एमआयडीसीतील कामगारांना लस देण्याबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना लस मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
- नीलेश लंके,
सदस्य, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ