पाथर्डी : सुजय विखे तुम्ही चिंता करू नका. अहमदनगर दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी मी, बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे प्रयत्न करणार आहोत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी आम्ही भांडणार नसून, या मतदारसंघात तीन वेळा राष्ट्रवादी हरली, एकदा तरी आम्हाला लढू द्या, अशी मागणी करून ही जागा काँग्रेसच्या पदरात पाडून घेऊ, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर घणाघाती हल्ला करीत सर्वसामान्यांना लुटणाऱ्या या सरकारला २०१९ च्या निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप मंगळवारी रात्री पाथर्डीत झाला. यावेळी झालेल्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, आ.जयकुमार गोरे, आ. सुधीर तांबे, माजी मंत्री शोभा बच्छाव, अण्णासाहेब म्हस्के, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राज्य सरचिटणीस विनायक देशमुख, उत्कर्षा रूपवते आदी उपस्थित होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे यांनी स्वागत केले. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आभार मानले.‘भाजप सरकारकडे केवळ घोषणांचे कारखाने’संगमनेर : भाजप सरकारकडे केवळ घोषणांचे कारखाने असून कुठेही विकास कामे नाहीत. शेतकरी कर्जमाफीची योजनाही फसवी ठरली आहे. भाजप सरकारबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण म्हणाले. कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा मंगळवारी संगमनेर तालुक्यात आली. यावेळी आयोजित सभेत खासदार चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नसीम खान, आमदार शरद रणपिसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, इब्राहिम भाईजान, आमदार भाऊसाहेब कांबळे, डॉ. सुजय विखे, आमदार हुस्नबानो खलीपे, माजीमंत्री शोभा बच्छाव, डॉ. राजीव वाघमारे, हेमलता पाटील, प्रकाश सोनवणे, सचिन सावंत, राजाराम पानगव्हाणे, अण्णासाहेब शेलार, दुर्गा तांबे, शरयू देशमुख, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक आदी उपस्थित होते.
दक्षिणेची जागा काँग्रेसकडे घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:51 AM