केडगाव : कोरोनाची तिसरी लाट कशीही असली तरी कुपोषित लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. लहान मुलांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी या काळात त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन नगरमधील बालरोगतज्ज्ञ संघटनेने केले आहे.
याबाबत त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कोरोना विषाणूच्या सातत्याने बदलत असलेल्या स्वरूपामुळे वैद्यकीय यंत्रणेला ठोस उपाययोजना करणे अवघड होत चालले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्यात झालेला संसर्ग लक्षणीय आहे. कुपोषित तसेच जन्मजात विकार असलेल्या लहान मुलांच्यामध्ये प्रतिकार क्षमता कमी असल्याने तिसऱ्या लाटेत अशा मुलांना धोका जास्त असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचा कोरोना विषाणू जास्त संसर्गजन्य असून त्याचे संक्रमण पहिल्या लाटेच्या तुलनेत लहान मुलांच्यात जास्त प्रमाणात होत आहे. सुदैवाने हे संक्रमण सौम्य स्वरूपाचे असून जास्त तीव्रतेची लक्षणे अद्यापतरी दिसून आलेली नाहीत. तसेच यातून लहान मुलांचे बरे होण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे.
सध्याच्या कोरोना संसर्गामध्ये लहान मुलांमध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा येणे, वास न येणे, खाद्यपदार्थांची चव न लागणे, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता आपल्या बालरोगतज्ज्ञांशी तत्काळ संपर्क साधून त्यांच्या सल्ल्याने संबंधित चाचण्या व औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन केले आहे.
लहान मुलांमध्ये आधीपासूनच श्वसनाचे विकार, मधुमेह, हृदयविकार असल्यास त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना जास्त जमाव असलेल्या ठिकाणी जाऊ न देणे, मास्कचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे, असे पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर डॉ. सागर वाघ, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. प्रताप पटारे, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. गणेश माने आदींच्या सह्या आहेत.
--------
मुलांना असा द्या आहार..
कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी त्यांना आहारात मोड आलेली मटकी, हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर, फळे, गूळ शेंगदाण्याचे लाडू, डिंकाचे लाडू तर मांसाहारी लोकांना अंडी, चिकन-मटणाचे सूप आदी सकस, पौष्टिक अन्नपदार्थ, पाणी व इतर द्रवपदार्थही द्यावेत.