अरुण वाघमोडे, अहमदनगर : तत्कालीन समाजामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली. त्यावेळी त्यांना अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले. मात्र देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष उलटली तरी देखील आजही समाजामध्ये विकृत विचारांचे लोक काम करत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई विषयी इंडिक टेल्स वेबसाईटने केलेले लिखाण आक्षेपार्ह असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा ओबीसी काँग्रेस विभागाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात झिंजे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राची भूमी ही महापुरुषांच्या कार्याने व कर्तुत्वाने पावन झालेली भूमी आहे. देशाला दिशा देण्याचे काम या भूमीतून महापुरुषांनी केले आहे. मात्र याच महाराष्ट्राच्या भूमीवर सातत्याने जातीयवादी पक्ष आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या विकृत पिलावळीकडून महापुरुषांचा अपमान केला जात आहे. हे षडयंत्र आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आक्षपार्ह मजकूर इंडिया टेल्सला आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याची हिम्मत व्हावी, याला निश्चितच जातीयवादी पक्ष, संघटनांचा पाठिंबा आहे.
यंत्रणेची यांना भीती वाटत नाही. कारण की विकृत विचाराचे लोक सध्या सत्तेत बसलेले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या देशाला दिशा देणाऱ्या कर्तुत्वान मातेचा अपमान काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. शासनाने महाराष्ट्रातील जनतेचा रोष पाहता तत्काळ विकृत आणि वाचाळ वृत्तीच्या दोषींना अटक करून तुरुंगात टाकायला हवे होते. मात्र अजूनही ठोस कारवाई शासन करायला तयार नाही. काही लोकांनी घाणेरडी वक्तव्य, लिखाण करायच आणि त्यांच्यावर दुसरा बाजूला कारवाई न करत त्यांना अभय द्यायचं, या मानसिकतेचा शहर जिल्हा ओबीसी काँग्रेस विभागाच्या वतीने तीव्र निषेध करत असल्याचे झिंजे यांनी म्हटले आहे.