संगमनेर : तहसिलदार साहेबराव सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे तालुक्यातील तळेगाव दिघे येथील दोन सख्या अल्पवयीन बहिणींचे बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. संबधित मुलींच्या आई-वडिलांचे समुपदेशन केल्यानंतर आई-वडिलांनीही हे बालविवाह थांबवण्याची भूमिका घेतली़तालुक्यातील तळेगाव दिघे येथील दोन सख्या अल्पवयीन बहिणींचे विवाह होणार असल्याची माहिती तहसिलदार सोनवणे यांना समजली. त्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना हे बालविवाह रोखण्याचे निर्देश दिले. शिंदे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी अलका जाधव व तळेगाव दिघे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शरद वावीकर, तळेगाव गटाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा पंडीत यांना त्या अल्पवयीन मुलींच्या माता-पित्यांची भेट घेऊन समुपदेशन करण्याच्या सुचना दिल्या़ ग्रामसेवक वावीकर, पर्यवेक्षिका नंदा पंडित हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांच्या पाठोपाठ तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अशोक जांभुळकर हे पथकासह दाखल झाले.सहायक फौजदार जांभुळकर व ग्रामसेवक वावीकर, पर्यवेक्षिका पंडीत यांनी बालविवाह होणार असल्याची खात्री केली. विवाह होणाºया दोन अल्पवयीन बहिणींपैकी एकीशी विवाह करणारा कोपरगाव तालुक्यातील वर तेथे हजर होता. या मुलींच्या आई-वडिलांसोबत दोन्ही वरांकडील संबधितांना पोलिसांनी बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे, असे समजावून सांगून त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर संबधितांकडून बालविवाह करणार नसल्याचे लेखी घेतल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तळेगाव दिघे येथे दोन सख्या बहिणींचे बालविवाह रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 4:10 PM