श्रीरामपूर : कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे शहर बंद होणार अशी अफवा पसरताच श्रीरामपुरात तळीरामांची धांदल उडाली. आठवडाभराची व्यवस्था करण्यासाठी दारूच्या दुकानांसमोर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा झडली.
शहरातील गोंधवणी रोड परिसरामध्ये गुरुवारी कोरोनाचा रुग्ण मिळून आला. त्यानंतर अफवांचे अक्षरश: पेव फुटले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी शहर आठ दिवस बंद ठेवण्याची सूचना केली. आदिक यांनी तसे पत्र प्रांताधिकारी अनिल पवार यांना दिले. ते थोड्याच वेळात सोशल मीडियावर पसरले आणि गोंधळाला सुरवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागापर्यंत बंदची अफवा पोहोचली.
शहरात किराणा मालाच्या दुकानांमध्ये गुरुवारी दुपारनंतर अत्यावश्यक गोष्टी खरेदीसाठी गर्दी झाली. अगदी वाहनांची वर्दळ वाढली. मात्र त्यापेक्षाही तळीरामांनी दारुच्या दुकानांसमोर केलेली गर्दी चर्चेचा विषय ठरली. शहर आठ दिवस बंद राहणार या भितीने तळीरामांनी साठा करण्यावर लॉकडाऊनमध्ये चढ्या भावाने दारूची खरेदी करावी लागली. तो झटका अद्यापही विसरलेले नसल्याने तळीरामांनी यावेळी मात्र खबरदारी घेतली. शहरातील सर्व दारुची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत गर्दीने फुलली होती.
प्रांताधिकारी अनिल पवार यांनी शहर बंदची मागणी फेटाळली. नगराध्यक्षा आदिक यांना तसे पत्र दिले. सायंकाळी साडे पाच वाजेनंतर प्रांताधिकाºयांचे पत्र सोशल मीडियावर झळकले. सरकारच्या आदेशाप्रमाणे कोरोना बाधिताचा परिसर वगळता संपूर्ण शहर बंद करता येत नाही. त्यामुळे व्यवहार नियमितपणे सुरू राहतील असे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर तळीरामांसह सर्वांचा जीव भांड्यात पडला.----------