अहमदनगर : प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून संप पुकारलेल्या राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनची बुधवारी मुंबईत सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ बैठकीत युनियनच्या १५ पैकी १४ मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले़ मात्र, मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास नसल्याचे सांगत मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावाणी होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे ऊस तोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी सांगीतले.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनने गेल्या तीन महिन्यांपासून बेमुदत संप पुकारला आहे़ या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील साखर संघाच्या कार्यालयात बैठक पार पडली़ या बैठकीला साखर संघाचे अध्यक्ष खासदार मोहिते पाटील, साखर आयुक्त शर्मा, कामगार मंत्र्यांचे मुख्य सचिव व ऊसतोडणी कामगार युनियनचे सात संचालक उपस्थित होते़ युनियनची मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली़ यावेळी सहकार मंत्र्यांनी १५ पैकी १४ मागण्या येत्या आठ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ कामगार युनियनने मात्र, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतरच बेमुदत संप मागे घेणार असल्याचा इशारा यावेळी दिला़ (प्रतिनिधी)प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनने गेल्या तीन महिन्यांपासून बेमुदत संप पुकारला आहे़ तीन महिन्यानंतर सहकार मंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले़ आमच्या १५ पैकी १४ मागण्या पूर्ण करण्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासनही दिले आहे़ मात्र आश्वासनाची आम्हाला शाश्वती नाही़ मागण्यांच्या अंमलबजावणीवर जोपर्यंत स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़ राज्यात ऊस तोडणी कामगार युनियनचे सुमारे १६ लाख सभासद असून, हे सर्व संपात सहभागी झाले आहेत़ त्यातच कारखान्याचा गाळप हंगाम जवळ आल्याने शासन युनियनसोबत तडजोडीच्या मानसिकतेत आहे़
ऊस तोडणी कामगारांची सरकारशी बोलणी फिस्कटली
By admin | Published: September 10, 2014 11:18 PM