मच्छिंद्र देशमुखकोतूळ : राज्यातील लोकसभा निवडणुका व गावोगावी यात्रा, जत्रा एकाच वेळी आल्याने आचारसंहितेमुळे गावच्या जत्रेतील महाराष्ट्राची लोककला संकटात सापडली आहे. संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंतच तमाशाला परवानगी दिली जाते. त्यामुळे एका बाजूला आचारसंहितेचा त्रास तर दुसरीकडे पोलिसांचा जाच, अशा दुहेरी संकटात तमाशा सापडला आहे. या आचारसंहितेमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा मुलगा कैलास विठाबाई नारायणगावकर यांना संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शंभर कलावंतांसह चार दिवस कार्यक्रमाअभावी एकाच ठिकाणी राहुटी देऊन रहावे लागले. यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली, असे त्यांनीसांगितले.
सध्या राज्यात सुमारे वीस हजार तमाशे व दीड लाख लोककलावंत आहेत. यात २०० तमाशांचे फड नोंदणीकृत आहेत. त्यातील २००० तमाशांचे फड मध्यम स्वरुपाचे आहेत. मध्यम स्वरुपाच्या तमाशात २० पेक्षा जास्त कलाकार असतात. तर त्यांच्या चार पट गाव तमाशे आहेत. गाव तमाशांमध्ये प्रामुख्याने आदिवासी, ठाकरी, कोकणी, खानदेशी, दशावतारी, नाचे अशा कलावंतांचा समावेश असतो.तमाशातील कलावंत हा राजकारणात व्होट बॅक ठरत नाही. इतर व्यावसायिक रंगभूमीला महामंडळ आहे. तमाशात वंचितांची संख्या मोठी आहे. त्यावर पोटपाणी चालणारे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. तमाशाच्या सांस्कृतिक विकासाचा अजेंडा ठरविण्यासाठी मालक, अभ्यासक, सावकारांनी एकत्र लढाई दिली तर गळचेपी होणार नाही. - डॉ. मिलिंद कसबे, तमाशाचे अभ्यासक.