चंद्रकांत शेळकेअहमदनगर : नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे गावठाणासह आठ वस्त्यांवर एकूण दोन टँकरच्या ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा होतो, परंतु संबंधित टँकरसोबत असलेले लॉगबुकच अपूर्ण असून, हे पाणीही ग्रामस्थांना पुरत नाही. एकदा पाणी भरले की त्या वस्तीवर पुन्हा तब्बल १३ दिवसांनी टँकर येतो, त्यामुळे विकतच्या पाण्यावरच ग्रामस्थांची भिस्त आहे.शुक्रवारी सकाळी बारा वाजता नारायणडोहो येथे भेट दिली असता, पहिली खेप गावातील विहिरीत टाकून संबंधित टँकरचालक दुसरी खेप आणण्यासाठी वसंत टेकडी उद्भवावर गेला होता. हा टँकर श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील लक्ष्मीमाता मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स संस्थेच्या ठेकेदाराचा आहे. साधारण तासभर वाट पाहिल्यानंतर तो एकच्या सुमारास आला. टँकरवर नियमानुसार शासकीय टँकर, उद्भवाचे नाव व कोठे खाली करणार त्या गावाचे नाव, असा फलक होता. जीपीएस यंत्रणा होती. परंतु लॉगबुक अपूर्ण होते. लॉगबुकमध्ये मंजूर खेपा, वाहन क्रमांक, वाहन क्षमता, किलोमीटरची माहिती या नोंदी नव्हत्या. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता समितीतील महिला सदस्यांची सही दि. ५ मेपासून नव्हती. ग्रामसेवकाच्या सह्या मात्र पूर्ण होत्या. इतर माहिती अपूर्ण असताना ग्रामसेवकाने सह्या कशा केल्या हा प्रश्न येथे उपस्थित होतो. टँकर आल्यावर थेट शिंदेवस्तीवर गेला. तेथे महिला, पुरूष सकाळपासूनच टँकरची वाट पाहत होते. टँकर रस्त्यावरच उभा राहून मोठी नळी जोडत रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या, ड्रम भरून देत होता. माणसी २० लिटरप्रमाणे पाणी पुरत नाही. आता पुन्हा हा टँकर १३ ते १५ दिवसांनी येईल.
टँकर गेले कुण्या गावा ? नारायणडोहो परिसरातील वस्तीवर १३ दिवसांनी टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 5:27 PM