सुधीर लंके । लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर जिल्ह्यात सन २०१९ मध्ये टँकरच्या बोगस खेपा दाखवून शासकीय बिले काढण्यात आल्याचे पुरावेच समोर आले आहेत. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पुरावे जमविले आहेत. विशेष म्हणजे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून वावरलेला कार्यकर्ता टँकर ठेकेदार असून त्यांच्या संस्थेबाबतच तक्रार झाली आहे.
नगर जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत टंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरच्या आधारे पाणी पुरवठा करण्यात आला. या पाणी पुरवठ्यासाठी शासनाने ठेकेदार नियुक्त केले होते. त्यासाठी १०१ कोटी रुपयांचे अनुदान खर्च झाले आहे. मात्र, या टँकर पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. पाणी पुरवठा करताना ठेकेदार संस्थांनी टँकरला ‘जीपीएस’ प्रणाली बसविणे आवश्यक होते. जेणेकरुन टँकर खरोखरीच गावात गेला की नाही यावर नजर राहील. मात्र, जिल्ह्यातील टँकर ठेकेदारांनी ‘जीपीएस’प्रणाली न बसविताच टँकर सुरु केले हे वास्तव ‘लोकमत’ने ११ मे रोजीच्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आणले होते. त्यानंतर ‘जीपीएस’ यंत्रणा सतर्क केल्याचा दिखावा ठेकेदार व जिल्हा प्रशासनाने केला. मात्र, त्यात बनावटगिरी झाल्याची तक्रार आहे. जीपीएसचा अहवाल असल्याशिवाय गटविकास अधिकाºयांनी टँकरची बिले अदा करु नयेत असा शासनाचा स्पष्ट आदेश आहे. मात्र, काही ठेकेदारांनी बनावट जीपीएस अहवाल तयार करुन बिले सादर केली व गटविकास अधिकाºयांनी ही बिले मंजूर केल्याचे तक्रारीवरुन दिसत आहे. (क्रमश:)
----पारनेर पंचायत समितीने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार एमएच-१८-एम-२८१७ या टँकरने १२ मे ते १६ मे या कालावधीत वाघुंडे खुर्द गावाला पाणी पुरवठा केल्याचे दिसत आहे. साई सहारा इन्फ्रा अॅण्ड फॅशिलिटी प्रा. लिमिटेड या ठेकेदार संस्थेने बिलासोबत सादर केलेला ‘जीपीएस’चा रिपोर्ट तसे दर्शवितो. प्रत्यक्षात त्यावेळी पारनेरच्या नागरिकांनी या टँकरचे ‘जीपीएस’ नकाशे काढून ठेवले असून त्याआधारे त्या कालावधीत हा टँकर पुणे, नवी मुंबई व औरंगाबाद परिसरात फिरताना दिसतो आहे. पारनेरच्या ‘लोकजागृती’ प्रतिष्ठानचे रामदास घावटे व बबन कवाद यांनी हे पुरावे समोर आणले आहेत. जीपीएसचे बनावट अहवाल बनवून जिल्ह्यात बिले काढण्यात आली असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
टँकर पुरवठ्याबाबत जी तक्रार झाली ती चुकीची आहे. तक्रारदारांनी ‘जीपीएस’चे खोटे नकाशे बनवून ही तक्रार केली आहे. आपण बिलांसोबत जे ‘जीपीएस’ रिपोर्ट जोडले ते बनावट नसून अधिकृत आहेत़ पंचायत समितीकडेही हे अहवाल आहेत़ जीपीएस कंपनीच्या वेबसाईटवरुन आम्ही पीडीएफ अहवाल काढले आहेत़ त्यात फेरफार नाही़ -सुरेश पठारे, टँकर ठेकेदार
टँकर पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे़ एकट्या पारनेर तालुक्यात २० कोटीचा निधी यावर खर्च झाला असून, याच संस्थेकडे श्रीगोंदा तालुक्याचाही ठेका होता़ नगर जिल्ह्यात सर्वत्रच या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे़ -बबन कवाद, तक्रारदार
कोण आहे टँकर ठेकेदार ?४पारनेर व श्रीगोंदा या दोन तालुक्यांत साई सहारा इन्फ्रा अॅण्ड फॅशिलिटी प्रा. लिमिटेड या कंपनीने टँकर पुरवठ्याचा ठेका घेतला होता. अण्णा हजारे यांचेसोबत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात विविध व्यासपीठावर दिसणारे सुरेश पठारे हे या संस्थेचे संचालक आहेत.