शेवगाव : ‘लोकमत’ने टँकर घोटाळा उघडकीस आणल्यानंतर महसूल पथकाने सोमवारी शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन वाड्या-वस्त्यांवर तसेच थेट विहिरींवर पोहोचून पिण्याच्या पाण्याचे टँकर वेळेवर येतात का? पाण्याचे वाटप व्यवस्थित होते का?, टँकरवर जीपीएस प्रणाली बसविली आहे का? ग्रामसमितीने नियुक्त केलेल्या महिलांच्या सह्या घेण्यात येतात काय? याबाबत चौकशी केली. तसेच गट विकास अधिकारी कार्यालयात येऊन जीपीएस यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही?याबाबत शहानिशा केली. यामध्ये कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचा दावा पथकाने केला आहे.शेवगाव तालुक्यातील ५० गावे २१५ वाड्या वस्त्यांना १२८ खेपांच्या माध्यमातून ६७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील आव्हाणे कोळगाव, ढोरजळगावने व निंबेनांदूर या ४ गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव १८ मे रोजी मंजूर झाल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून देण्यात आली.अहमदनगर जिल्हा परिषदेतील रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस व जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी तालुक्यातील वरूर बुद्रूक, खरडगाव, आखेगाव, मुर्शदपूर, वाडगाव, अंतरवाली, हसनापूर, कोनोशी आदी गावांना भेटी देऊन टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याची माहिती घेतली. यावेळी विविध गावातील ग्रामस्थांनी टँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी करून टँकर वेळेवर पोहोचण्याबाबत संबंधिताना सूचना देण्याची मागणी केली. पथकाने राक्षी येथील उद्भवावर जाऊन तेथील टँकर भरण्याच्या व्यवस्थेची माहिती घेऊन संबंधिताना नियोजनाबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या.शहर परिसराची प्रतीक्षा कायमशेवगाव शहरात ८ ते १० दिवसांमधून एकदा अल्प वेळ पाणी पुरवठा सुरू आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था कोलमडली आहे.शहराजवळील कोरडे वस्ती, कोल्हे वस्ती, डोईफोडे वस्ती, ढाकणे वस्ती, गहिले वस्ती, सोनामिया वस्ती, ग्रामीण रूग्णालय परिसरासाठी नगरपालिकेने सादर केलेल्या ४ टँकरच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.शहराजवळील खंडोबा माळ येथील उद्भवावरून टँकर भरण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. मात्र अंमलबजावणी रेंगाळल्याने शहराजवळील वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांची टँकरची प्रतीक्षा कायम आहे.
टँकर घोटाळा : चौकशी पथक पोहोचले विहिरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 3:56 PM