अहमदनगर : २१ मे अखेर जिल्ह्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या वाढत १८५ वर पोहचली आहे. या टँकरव्दारे तीन लाखांहून अधिक जनतेची तहान सरकारी पाण्याच्या टँकरने भागविली जात आहे. महिनाअखेर यात आणखीन वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केलेली आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यंदा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ३७ कोटी ६४ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र, मे महिन्यांत पाण्याची वाढलेली तीव्रता आणि पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पावणेपाच कोटींचा पुरवणी आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या आराखड्यात टँकरसाठी ३२ कोटी ११ लाख, तर पुरवणी आराखड्यात टँकरसाठी ४ कोटी ६४ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला सव्वा लाख जनतेला पाणी पुरवठा करण्यात येत होता. १६ मे पर्यंत हा आकडा अडीच लाखांपर्यंत होता. २० मे नंतर यात वाढ होत तीन लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याचा पुरवठा होत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्यात ४२ आहेत. नगर तालुक्यात ३६, संगमनेर २९, कर्जत १५, शेवगाव आणि जामखेड प्रत्येकी १३ उर्वरित तालुक्यात कमीत एक तर जास्तीत जास्त दहापर्यंत टँकर सुरू आहेत. श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही. या ठिकाणी किमान पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकलेला आहे. जिल्ह्यात २० गावांत पिण्याच्या पाण्यासाठी अथवा सरकारी पाण्याचे टँकर भरण्यासाठी खासगी विहिरी अधिग्रहीत केलेल्या आहेत. राहुरी तालुक्यातील कुरणवाडी योजना वीज ंिबल न भरल्याने पाच दिवस बंद होती. या योजनेला जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्ती फंडातून १७ लाख रुपये देण्यात आले असून त्यामुळे शुक्रवारी योजना सुरू होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यांनी दिली. घोसपुरी योजनेचेही पैसे भरले असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन लाख जनतेला टँकरचे पाणी
By admin | Published: May 23, 2014 1:16 AM