राहुरी विधानसभा विश्लेषण-भाऊसाहेब येवले । राहुरी : राहुरी मतदारसंघात कमळाला धक्का देत घड्याळाची टिकटिक सुरू झाली. २५ वर्षे आमदारकी केलेल्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव कोरी पाटी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केला. दुरंगी लढत आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती यामुळे तनपुरे यांच्या मदतीला आली. थांबलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणे, हेच नूतन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यापुढे आव्हान असणार आहे़.राहुरी मतदार संघात एक महिन्यापूर्वी शिवाजी कर्डिले यांचे वातावरण भक्कम होते़ मात्र गेल्या १५ दिवसात प्राजक्त तनपुरे यांच्यामागे गावोगावी युवकांची फळी उभी राहिल्याने आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले़ प्रचारादरम्यान वातावरण तयार झाले. मतमोजणी १७ फेºयांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी ३६ हजार ५८ मतांचे अधिक्य घेत शिवाजी कर्डिले यांच्यासमोर आव्हान उभे केले़ वांबोरी गटामध्ये धाकधूक सुरू असतांना तनपुरे यांना मताधिक्य मिळाले़ नगर व पाथर्डी तालुक्यात शिवाजी कर्डिले यांचा बालेकिल्ला होता़ मात्र तिथेही राहुरी तालुक्यात तयार झालेला मतदानाचा डोंगर कमी करण्यात कर्डिले यांना अपेक्षित यश आले नाही़ १६ वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले़ राहुरी मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर नगर व पाथर्डी तालुक्यातील काही गावे मतदारसंघात आली. राहुरीतून एकच उमेदवार उभा राहत नव्हता. त्याचा कर्डिले यांना फायदा मिळत गेला. यावेळी मात्र सरळ लढत झाली. कर्डिले यांचा मतदारसंघात संपर्क दांडगा होता. मात्र राहुरीने तनपुरे यांना साथ दिली. तनपुरे यांचा शांत स्वभाव मतदारांना भावला. कर्डिले यांच्या पाठिशी विखे यांचीही ताकद होती. मात्र, ते कर्डिले यांना विजयी करु शकले नाहीत. जनता जनार्दनाचा आमदारमी जनतेचा आमदार आहे़ राहुरी मतदार संघाच्या खुंटलेल्या विकासाला चालना दिली जाईल़ पाणी, बेरोजगारी याकडे लक्ष दिले जाईल़ पूर्वीचे वैभव मिळवून देण्यावर माझा भर राहिल़, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त सरळ लढत झाल्याने राहुरी मतदार संघात अन्य पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले़ अपक्षांनी कमी मते खेचल्याने प्राजक्त तनपुरे यांना दिलासा मिळाला़ गेल्या निवडणुकीत चौरंगी लढतीचा फटका बसला होता़ यानिवडणुकीत अपक्ष पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले़
राहुरी मतदारसंघावर पुन्हा एकदा तनपुरे यांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:33 PM