राहुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी बालाजी मंगल कार्यालयात ८० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. तेथे राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठबळाने नगरसेवक नंदकुमार तनपुरे, संतोष आघाव, महेश उदावंत, नरेंद्र शिंदे, जीवन गुलदगड, नंदकुमार गागरे, दत्तात्रय कदम, गणेश कोहकडे यांनी निधी उभारत रुग्णांसाठी सेवा उपलब्ध केल्या होत्या. राहुरी परिसरात कोरोना रुग्णांचा होणारा खर्च व ऑक्सिजन बेडसाठी होणारी धावपळ पाहता राज्यमंत्री तनपुरे यांनी संबंधित कोविड सेंटर प्रशासनाकडे सुपूर्द केले. प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड यांनी बालाजी मंगल कार्यालय येथील कोविड सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांना अधिक लाभ होणार असल्याचे सांगितले. ८० ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याने शासकीय यंत्रणेला सुलभता येणार असल्याचे तहसीलदार शेख यांनी सांगितले आहे.
राहुरी कृषी विद्यापीठ येथे ६०० बेडचे कोविड सेंटर सुरू आहे. त्यासह वांबोरी ग्रामीण रुग्णालय, म्हैसगाव ग्रामीण रुग्णालय, कणगर कोविड सेंटर, सडे ग्रामपंचायत कोविड सेंटर, उंबरे कोविड सेंटर, राहुरी फॅक्टरी कोविड सेंटर, स्व. शिवाजीराजे गाडे बारागाव नांदूर कोविड सेंटर, असे कोविड सेंटर तालुक्यात आहेत.
...................
राहुरी तालुक्यातच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बालाजी मंदिर येथील ऑक्सिजन प्लांटसाठी ३५ लाख खर्च होणार असून, २० लक्ष रुपये अदा केले असल्याची माहिती राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली.
.....................
गागरे यांची एक लाखाची मदत
कोरोना काळात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील कोविड सेंटरसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासाठी उद्योजक नंदू गागरे यांनी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सेवाभावी संस्थेला कोविड काळात सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयाची मदत दिली.