अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पवार-राणे ट्विट युद्धात रविवारी (दि़१७) ग्रामीण विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेत निलेश राणे यांना थेट इशाराच दिला आहे. ‘पवार घराणे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. आणि हो टप्प्यात आल्यावर राष्ट्रवादीवाले कार्यक्रम करतात,’ असे तनपुरे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योग वाचविण्याची मागणी केली होती. त्यावर शनिवारी भाजप नेते निलेश राणे यांनी कोणत्या साखर कारखानदाराकडे किती संपत्ती आहे, याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी ट्विटद्वारे केली होती. राणेंच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, ‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठविले आहे.
पवार साहेब अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्ट मांडत आहेत. त्यामुळे मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी़’ पवारांच्या या प्रतिक्रियेवर राणे यांनी पुन्हा ट्विट करत म्हटले, ‘मी साखरेवर बोललो. पवार साहेबांवर नाही. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक नको टाकू. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी.. या ट्विटनंतर मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही पवार- राणे ट्विट युद्धात उडी घेत राणेंना लक्ष्य केले.
तनपुरे यांनी ट्विट करीत म्हटले की, ‘आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत मांडले. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पवार कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करतात. आणि हो राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राणे विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील हे वाक् युद्ध आणखी भडकू शकतं.