सिध्दटेक : समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांना लगावला.कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार सुजय विखे, आमदार सुरेश धस, राजेंद्र नागवडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, राम शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील घडलेले नेतृत्व आहे. ते शिकले, प्राध्यापक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री झाले. त्यांनी अत्यंत चांगले काम केले. कोणी त्यांच्यावर नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न केला तर मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही. कारण ते सतत जनतेत असतात. याच जनतेच्या जोरावरच ते निवडणूक लढवित आहेत. गतवेळी ते ३८ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी त्यांना ५० हजार मतांनी निवडून द्या. विरोधक म्हणतात, मते द्या नाहीतर कारखान्याला ऊस नेणार नाही. पण शेतक-यांनी काळजी करु नये. रामभाऊ सरकार आपलेच आहे. नवीन कारखाना उभा करा, असे आवाहन त्यांनी केले. आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. हा काही साधा गडी नाही. तो भल्याभल्यांना पुरून उरला आहे. रामभाऊंनी शेतकºयांसाठी मोठी कामे केली. ३९०० कोटी रुपयांची कुकडी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. तुकाई चारी योजना, शासकीय कृषी महाविद्यालय आणले, असे अनेक विकास कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. राज्यात सरकार भाजपचेच येणार आहे. यापुढेही ते याच पध्दतीने काम करीत राहतील. त्यांच्या मागे उभे रहा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.प्रा. राम शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री खास माझ्यासाठी प्रचार सभेला आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून मतदारसंघात भरपूर कामे केली. हे काम करताना मी कोणाशी आकसाने वागलो नाही. सर्वांना समान न्याय दिला. त्यामुळेच मतदारसंघात विकास काम करू शकलो. सिध्दटेकला पर्यटन विकास निधी दिला. मतदारसंघात रस्ते केले. कर्जतला पाणी प्रश्न सोडविला. मिरजगावला १० कोटींची पाणी योजना राबविला. साठ सत्तर वर्षाचा विकासाचा अनुशेष आहे. भरपूर अनुशेष भरुन काढण्याचे काम केले. सरकारच्या सर्वसामान्यांच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले. राष्टÑवादी काँग्रसला माझ्या विरोधात मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. उमेदवार आयात करावा लागला, हीच मोठी खंत आहे, असेही ते म्हणाले.
...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 4:18 PM