श्रीरामपूर/बेलापूर : परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने बारावीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरूद्ध बेलापूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर त्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर, श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिली. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. मंगळवारी श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला. मुलीने आईला प्राध्यापकाच्या या कृत्याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर काही जागरुक नागरिकांनी महाविद्यालयात जाऊन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना हा प्रकार सांगितला. यावेळी माफीनामा लिहून देत त्या शिक्षकाने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही घटना सर्वश्रुत झाल्याने बुधवारी हे प्रकरण वाढले. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली. बुधवारी सकाळी १० वाजता ग्रामस्थ विद्यालयात जमा झाले. शिक्षकाला निलंबित करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. त्यास ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे, अशी संतप्त जमावाची मागणी होती. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे तातडीने दाखल झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तो शिक्षक फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर असून त्यास लवकरात लवकर ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ग्रामस्थांनी बंद मागे घेतला आहे.
कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:18 PM