अहमदनगर : कर्मचाऱ्यांना नेहमीच आपला पगार वेळेवर व एक तारखेलाच व्हावा ही एकच अपेक्षा असते. याबाबत प्रशासनाला संघटनांकडून वेळोवेळी निवेदन देण्यात येते. जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम यांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि त्यानुसार सप्टेंबर पेड ऑक्टोबरचे वेतन १ ऑक्टोबर रोजी झाल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक आहेत. यापूर्वी शिक्षकांचे पगार तालुकानिहाय वेगवेगळ्या तारखांना होत होते. यात कधी पंधरा ते वीस तारखेपर्यंतही वेळ जात होता. परंतु आता जिल्हा परिषदेच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे शिक्षकांचे पगार एक तारखेला जमा करण्यात आले आहेत. सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या खात्यात रविवारी सकाळी ९ वाजता वेतन अदा करण्यात आले.या कामात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेख, जिल्हा शालार्थ प्रमुख योगेश पंधारे यांच्या तांत्रिक सहकार्याने वेतन अदा करण्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली. वेतन १ तारखेलाच जमा झाल्याने सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण, तसेच जि. प. पीएफएमएस प्रणालीबाबत विश्वासार्हता वाढली आहे. यापुढेही प्रत्येक महिन्यात एक तारखेलाच वेतन जमा व्हावे, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.