अहमदनगर : जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग दरवर्षी १४ तालुक्यातून प्रत्येकी एका प्राथमिक शिक्षकाला जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करते. हा सोहळा ५ सप्टेंबरला पार पडत असतो. यंदा मात्र, या सोहळ्यावर आचारसंहितेचे सावट आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा सोहळा या वर्षी पार पडतो की नाही, अशी शंका शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातून १४ शिक्षकांना तालुकानिहाय जिल्हा पुरस्कार देण्यात येतो. मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून मोठी स्पर्धा असते. यासाठी शिक्षण विभागाने २०० गुणांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या २०० गुणांची प्रश्नांची प्रश्नपत्रिका जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांनी संबंधित शिक्षकांना या प्रश्नपत्रिकानुसार प्रस्ताव तयार करून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावयास सांगण्यात आले आहे. प्रत्येक अधिकाअधिक गुण मिळविणाऱ्या शिक्षकांतून दोन शिक्षकांची निवड करून त्यांची नावे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहे. त्याठिकाणी संबंधित शिक्षकाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार शिक्षण विभाग क्रॉस चेकिंग करणार आहे.त्यानंतर पुन्हा दोन्ही शिक्षकांची नावे शिक्षण विभागाकडे येणार असून त्या ठिकाणी पदाधिकारी आणि प्रशासन अंतिम निर्णय घेऊन प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकांचे नाव पुरस्कारासाठी अंतिम करणार आहेत. शिक्षण विभागाने यंदाही प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संकेत स्थळावर २०० गुणांची प्रश्नपत्रिका टाकली असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, याच काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे प्रशासन पातळीवर पुरस्काराचे नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
शिक्षक पुरस्कारावर आचारसंहितेचे सावट
By admin | Published: August 10, 2014 11:19 PM