विनोद गोळेपारनेर : पळसपूरच्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन बी.ए.,बी.एड. चे शिक्षण घेऊन २००७ पासून खडकवाडीच्या नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय आंधळे अवघ्या साडेतीन हजार रूपये दरमहा मानधनावर ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अल्पमानधनामुळे आंधळे गुरूजींचे भविष्य अंधकारमय बनले आहे.पारनेर तालुक्यातील पळसपूर, पोखरी खडकवाडी, डोंगरवाडीसह अनेक गावे दुर्गम आहेत़ याच भागात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून आंधळे यांनी बी़ ए़ करून इतिहास व हिंदी विषयात बी़एड़ केले़ आंधळे यांनी बी़ए़,बी़एड केल्यानंतर शिक्षकाची नोकरी लागेल, म्हणून त्यांनी २००७ मध्ये खडकवाडी येथील नूतन विद्यालयात शिक्षक म्हणून काम सुरू केले. अकरावी, बारावीला शिक्षण देताना आपल्या शाळेस सरकार कधी तरी अनुदान देईल व आपण कायमस्वरूपी शिक्षक होऊ, या आशेवर ते अकरा वर्षे काम करीत आहेत. पहिल्या टप्प्यात नूतन विद्यालयाचे अकरावी व बारावीचे वर्ग नवीन सुरू झाल्याने व गाव ग्रामीण भागात असल्याने अल्पशा मानधनावर काम सुरू केले.नोकरी आहे म्हणून २०११ मध्ये विवाह झाल्यानंतर साडेतीन हजारांमध्ये संसाराचा खर्च पुरेना म्हणून मग संजय व पत्नी वर्षा यांनी पळसपूरमध्ये किराणा दुकान सुरू केले़ मांडवे गावातील शेतीकडेही लक्ष देऊन सुट्टीच्या काळात शेती व सकाळी सात ते दहा दुकान, दुपारी अकरा ते पाच शाळा व सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुन्हा किराणा दुकान सांभाळणे असा शिक्षक गुरूजींचा नित्यक्रम आहे. दिवसभर त्यांच्या पत्नी किराणा दुकान सांभाळतात़ एवढ्या पगारात आम्ही काटकसरीने संसार चालवतोय, पण सरकारने शाळांना लवकर अनुदान द्यावे, असे संजय यांची पत्नी वर्षा आंधळे सांगत होत्या. साडेचार वर्षांच्या भक्ती या त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचाही खर्च आता आमच्या नियोजनात वाढणार आहे,असे शिक्षक आंधळे सांगत होते.