बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : आई, वडिलांनी काबाडकष्ट करून शिकविले. रूईखेल येथील विनाअनुदानित विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी लागली. वर्षभरात अनुदान मिळेल, अशी आशा होती. दररोज ६० किलोमीटरचा मोटारसायकल प्रवास, तब्बल १५ वर्षांचा काळ लोटला तरी अनुदान नाही. मात्र आपले स्वप्न साकार होण्यासाठी लढा सुरू आहे, रूईखेल विद्यालयाचे मुख्याध्यापक सयाजी गायकवाड आपल्या लढ्याविषयी सांगत होते.श्रीगोंदा तालुक्यात रूईखेल, पिसोरेखांड, ढोरजा, कोरेगाव, ढवळगाव गणेशा ही विद्यालये अनुदानाच्या लालफितीत अडकली आहेत. सुमारे ४० शिक्षकांचे भवितव्य अंधारमय बनले आहे. सरकारने अनुदान दिले तर या गुरूंच्या जीवनात प्रकाश येणार आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. पण सरकारने शाळांना अनुदान देताना पळवाटा काढल्या. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मी दररोज ६० किलोमीटरचा प्रवास मोटारसायकल-वरुन करीत आहे. दररोज शेतीत काम करून मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकावे लागते. पगार नसल्याने कोणतीही प्रगती झाली नाही. पण शिवाजीराव नागवडे मागे उभे असल्याने संघर्षाची हिंमत मिळाली आहे. काही शिक्षक ग्रामपंचायतीत लिखाणाचे, तर काही शिक्षक दुकानावर अर्धवेळ काम करतात. दु:ख, वेदना मोठ्या आहेत. पण कुणाला सांगणार? अबोल दु:ख, अशी अंतर्मनातील भावना असल्याचे गायकवाड म्हणाले.
शिक्षक दिन विशेष : स्वप्नपूर्तीसाठी १५ वर्षांपासून बिनपगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:23 PM