हेमंत आवारीअकोले :अठरा वर्षे विना अनुदानित माध्यमिक शाळेवर पोटाला टाच देऊन काम केले. यंदा जूनमध्ये ही शाळाच बंद झाली. पाच शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी घरची थोडी शेती आणि जीवनविम्याचे काम यावर तगलो असल्याचे शिक्षक बाळासाहेब गवराम मालुंजकर सांगतात.न्यायालयात जाऊन दाद मागायचीय पण कुणाची साथ नाही, आर्थिक परिस्थिती नाही. सोबतचे शिक्षक संस्था चालकांच्या दबावामुळे पुढे येत नाहीत असे मालुंजकर सांगत असताना त्यांना आपले अश्रू लपवता आले नाही. माळेगावची शासन मान्यता प्राप्त पण विना अनुदानित माध्यमिक शाळा बिंदू नामावली (रोस्टर) पूर्ण न केल्यामुळे बंद झाली असून या शाळेत मालुंजकर शिक्षक म्हणून कार्यरत होते. २००९ ला या कायमस्वरुपी विना अनुदानित शासनमान्य शाळाच्या पुढील ‘कायम’ हा शब्द काढून टाकण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील आंबड, टाकळी, वीरगाव, गुहिरे, ठोकळवाडी, गोडेवाडी या शाळांना २० टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. तालुक्यातील रुंभोडी येथील बाळसाहेब मालुंजकर यांच्यासह माळेगाव माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करणारे बुधा सखाराम गोडे, पंढरीनाथ भावका घुले, सीमा धिरज आवारी, साहेबराव लांडगे यांना १८ वर्षांच्या सेवेनंतर घरी बसावे लागले आहे.