अहमदनगर : शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांनाच गोंधळ घातला म्हणून पोलिसांनी दंडुका उगारत बाहेर काढण्याची घटना रविवारी शिक्षक बँकेच्या सभेत घडली. अहमदनगर शिक्षक बँकेच्या इतिहासातील गोंधळाची ही परंपरा कायम राहिली. गाेंधळ घालणाऱ्या थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, ते थांबत नाहीत. सभेतील गोंधळ शांत होत नाही, हे पाहता अखेरीस पोलिसांनाच दंडुक्याची भीती दाखवून गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांना बाहेर काढावे लागले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२८) ऑनलाइन पद्धतीने झाली. मात्र, शिक्षक संघटनांच्या मोजक्याच प्रतिनिधींना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता. सकाळी दहा वाजता सुरू झालेली सभा दुपारी तीन वाजता संपली. बँकेचे अध्यक्ष राजू राहाणे यांनी तब्बल दीड तासाचे प्रदीर्घ प्रास्ताविक भाषण केले. त्यानंतर सभेपुढील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात विविध संघटनांचे प्रतिनिधी संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, राजू साळवे, राजेंद्र निमसे, एल. पी. नरसाळे, मीनल शेळके, विकास डावखरे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र ठोकळ, संतोष वाघमोडे, विठ्ठल काळे आदींनी मते व्यक्त केली.
संचालक व विरोधकांना बोलण्यासाठी प्रत्येकी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. विकास डावखरे यांनी परवानगी न घेताच भाषण सुरू केले. आपल्या भाषणात त्यांनी बँकेच्या संचालक मंडळावर जोरदार टीका केली. घड्याळ खरेदी, बँकेच्या वार्षिक ताळेबंद, बँकेचे विस्तारीकरण अशा अनेक मुद्यांवर डावखरे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. १५ मिनिटे भाषण झाल्यानंतर त्यांना थांबण्याची विनंती करण्यात आली. मात्र, ते थांबले नाहीत. त्यावर गुरुमाउली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे म्हणाले, घड्याळ खरेदी माजी अध्यक्षांच्या निर्णयानुसार झालेली आहे. जे लोक परवानगी न घेता सभेत शिरकाव करतात, ते नेता तसा कार्यकर्ता या वृतीप्रमाणे वागतात. त्यांनी ४५ मिनिटे वेळ घेऊन सभेला गालबोट लावले. त्यानंतर शिक्षक परिषदेचे प्रवीण ठुबे यांनीही संचालकांवर जोरदार टीका केली. वेळेचे बंधन पाळा असे सांगत ठुबे यांना थांबण्याची सूचना करण्यात येत होती. मात्र, ठुबे थांबत नव्हते. अखेरीस पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करीत ठुबे यांना बाहेर जाण्यास सांगितले.
डावखरे आणि ठुबे यांनी घातलेल्या गोंधळाने सभेला काही वेळ गालबोट लागले. मात्र, नंतर सभा सुरळीत सुरू झाली. या ऑनलाइन सभेला झूम ॲप व यू-ट्यूबच्या माध्यमातून ३ हजार ८०० सभासदांनी हजेरी लावली. साहेबराव आनाप यांनी आभार मानले.
----------------------------
विकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी आजच्या सभेत घातलेला गोंधळ हा अशोभनीय असून ऑनलाइन सभा असल्याने गोंधळ होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, या लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सभेला गालबोट लागले. गेली पंधरा वर्षे बँकेच्या सभेत कोणते लोक गोंधळ घालतात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.
-राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष, गुरुमाउली मंडळ
-------------------------
बहुसंख्येने जिल्ह्यातील बहुसंख्य सभासदांच्या भावना लक्षात घेऊन बँकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याचा विषय पुढील सभेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
-राजू राहाणे, अध्यक्ष, शिक्षक बँक
...............
हे विषय झाले मंजूर
सभेपुढे एकूण १३ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यातील बँकेच्या विस्तारीकरणाचा विषय नामंजूर करण्यात आला. तर स्टाफिंग पॅटर्न १४५ वरून ११५ करणे, कर्ज व्याजदर आणि ठेवीचा व्याजदर यात तीन टक्के मार्जिनचा फरक ठेवणे, कायम ठेव १ हजार रुपये करणे, मयत सभासदाचे ३५ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणे, कन्यादान योजनेचे नाव बदलून शुभमंगल योजना करणे असे एकूण १२ विषय सभेत मंजूर करण्यात आले.
.............
‘ते’ पुस्तक गायब कसे झाले
जिल्हा परिषदेच्या वतीने एक कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. त्यासाठी शिक्षक बँकेने ४ लाख रुपये खर्च केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालिन अध्यक्षांच्या हस्ते झाले. मात्र, ते पुस्तक नंतर कोठेच दिसले नाही. ते पुस्तक गायब कसे झाले, याचा उलगडा झाला पाहिजे. घड्याळ खरेदीत विरोधी मंडळाचा कोण नेता होता, हे जाहीर करा. मग त्याच्याही गळ्यात चपलांचा हार घालू; पण बँकेने घड्याळ खरेदीचा हिशोब पारदर्शकपणे द्यावा, बँकेचे सॉफ्टवेअर बदलावे, अशी मागणी शिक्षकनेते संजय कळमकर यांनी केली.