अहमदनगर : सध्याच्या बिकट परिस्थितीत शिक्षक समाजाप्रती संवेदनशिलता ठेवून करत असलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी काढले.
प्राथमिक शिक्षक अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून चिचोंडी पाटील व जेऊर कोविड सेंटरला १५ बेड देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कळमकर म्हणाले, शाळा बंद असल्याने शिक्षकांना फुकट पगार मिळतो, असा काही घटकांचा समज आहे. जिल्हाभरात वेगवेगळ्या कोविड सेंटरला एक कोटी रुपयांच्यावर प्राथमिक शिक्षकांनी मदत जमा करून दिली आहे. कोरोना आघाडीवर कर्तव्य करताना शिक्षकांबरोबर त्यांची कुटुंबेही बाधित झाली आहेत तर काही शिक्षकांचे मृत्यूही झाले आहेत. तरीही अशोक कुटेंसारखे शेकडो शिक्षक समाजाला आधार देण्याचे काम करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
अशोक कुटे व उद्योजक गोरख गहिले यांच्या प्रयत्नातून पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक प्रभाकर शिंदे व काकासाहेब शिंदे यांनी नेवासा कोविड सेंटरला १०० बेड, २ मिनी अँम्ब्युलन्स, २० नवीन ऑक्सिजन सिलेंडर भेट दिले होते. जेऊरचे आरोग्याधिकारी डॉ. कर्डिले, चिचोंडीचे डॉ. नेवसे, डॉ. तोडमल यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी जयश्री कुटे, महेश पवार, वैभव निकम, अमित कळमकर, बाळासाहेब पवार, नंदू वाव्हळ, गणेश लंघे, मराठी सोयरीक संस्थेचे कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तसेच मराठा उद्योजक लॉबी, सकल मराठा समाज याकामी मदतकार्य करीत आहे.
...............
यांनी केली कोविड सेंटरला मदत
पिंटू झोडगे, गोरख गहिले, बबनराव लोंढे, जयश्री अशोक कुटे, योगेश कटारे, संदीप सायंबर, अनिल साळुंखे, बाळासाहेब पठारे, गणेश नन्नवरे, योगेश हजारे, प्रवीण येवले, मंगेश सातपुते, संदीप सर्जेराव कोतकर आदींनी कोविड सेंटरला मदत करण्यास पुढाकार घेतला.
................
अशोक कुटे या प्राथमिक शिक्षकाने व त्यांच्या विविध क्षेत्रातील मित्रांनी दर्जेदार १५ बेड देऊन गरज असलेल्या ग्रामीण भागात योग्य मदत केली आहे.
-उमेश पाटील, नगर तहसीलदार