चंद्रकांत शेळके, अहमदनगर : विद्यार्थ्यांचे अध्यापन हे शिक्षकांचे मुख्य काम असताना शासनाने लादलेल्या विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखालीच शिक्षक दबला आहे. त्यामुळे या अशैक्षणिक कामांविरोधात २७ डिसेंबर रोजी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयावर राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर यांनी केले आहे.संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा हा भव्य मोर्चा निघणार असून, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे व राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात सहभागी व्हावे, असेही गाडेकर यांनी म्हटले आहे.
शिक्षकांवर नेहमीच अशैक्षणिक कामे सोपवली जातात. त्यात आता शासनाने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी शिक्षकांकडेच दिली आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्याची ही मोहीम २०२७ पर्यंत चालणार आहे. यावर राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने सुरुवातीपासूनच बहिष्कार टाकला आहे. असे असतानाही मागील आठ-दहा दिवसांपासून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांवर सक्ती केली जात आहे. विनावेतन करू, वेतनवाढी रोखू, फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा धमक्या शिक्षकांना दिल्या जात आहेत. या अन्यायकारक सक्तीविरुद्ध संघटना आक्रमक झाली असून, २७ डिसेंबर रोजी दुपारी एक ते चार या वेळेत शनिवार वाड्यापासून शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती राज्य संघाचे नेते दत्ता कुलट, राज्य संपर्कप्रमुख गोकुळ कळमकर, विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर, उच्च अधिकाराचे अध्यक्ष राजकुमार साळवे, अर्जुनराव शिरसाट, रवींद्र पिंपळे, भास्कर कराळे, गुरूमाउली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे, शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे आदींनी दिली.