पाचेगाव : गेल्यावर्षी झालेल्या अवकाळीने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. यंदाही तशीच परिस्थिती ओढविली आहे. सध्या अवकाळीबराेबरच घसरत्या दराने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यामुळे उत्पादन खर्चातही कमालीची वाढ झाली आहे. असे चित्र सध्या नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
मागील वर्षाचा कटू अनुभव विसरून यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये किलो बियाणांचा दर असतानाही शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा जाणवला. अनेक जिल्ह्यातून बियाणे आणून शेतकऱ्यांनी कांद्याचा जुगार खेळला. अनेकांची बियाणांमध्ये फसवणूकही झाली. अशा परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक जोमात आणण्याचा प्रयत्न केला.
वाढता मजुरी दर, खते, औषधे यांच्या किमतीत झालेली वाढ, ही कांदा पिकाचे उत्पादन खर्च वाढविणारी ठरली. यंदा खरीप हंगामापासूनच हवामानही फारसे अनुकूल नव्हते. १५ डिसेंबरनंतर उन्हाळ कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली. या महिन्यात लागवडीचे प्रमाण नगण्य होते. जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवडी सुरू होत्या.
फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील अनेक मार्केटमध्ये कांद्याला साडेचार हजार रुपये क्विंटलचा भाव होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही भाव टिकून होते; मात्र अचानक दरात घसरण होण्यास सुरुवात होऊन हजार ते पंधराशे रुपये क्विंटलपर्यंत भाव खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होतो की नाही, अशीच शंका निर्माण व्हायला लागली. महावितरणने ऐन टप्प्यात वीज बिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांना झटका दिला. त्यातच अवकाळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागला. आता पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले असून लॉकडाऊन करायची वेळ आल्यास शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
---
कांदा उत्पादनाचा एकरी खर्च असा..
नांगरट व मशागत- ५ हजार, बियाणे- १० हजार, रोपे तयार करणे- ७ हजार, लागवड-१० हजार, खुरपणी- ५ हजार, खते- १० हजार, फवारणी-७ हजार, काढणी-१० हजार असा एकूण ६४ हजार खर्च येतो. पाणी भरणे व वीज बिलाचा खर्च वेगळाच असतो.