अहमदनगर: महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदारांनीही उडी घेतली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयांचेही कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांची ससेहोलपट चौथ्या दिवशीही सुरुच होती़कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी महसूल दिनाचे औचित्य साधून बेमुदत संप पुकारला आहे़ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनाकडून दखल घेण्यात आली नाही़ त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला़ संपाचा मंगळवारी चौथा दिवस होता़या संपात जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदारही सहभागी झाले आहेत़ पगार वाढीसाठी संघटनेकडून वेळोवेळी मागणी करण्यात आली़ मात्र शासनाने याबबात धोरणात्मक निर्णय घेतला नाही़ त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात तहसीलदार सहभागी झाले असून, जिल्ह्यातील तहसील कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयात नागरिकांची कामे झाली नाहीत़ विविध प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून मिळतात़ परंतु त्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते़ महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असणारे जातीचे दाखले येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळतात़ परंतु हा विभागही संपामुळे बंद होता़ जिल्हाभरातून दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना हे दाखले मिळाले नाहीत़महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे़ कर्मचाऱ्यांच्या २५ मागण्या आहेत़ या मागण्यांबाबतचा निर्णय झाला होता़ मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी हा संप सुरू केला आहे़ संप सुरू होऊन चार दिवस लोटले आहे़ याविषयी बुधवारी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शासनाने चर्चेसाठी निमंत्रित केले आहे़ यापूर्वी चर्चा होऊन निर्णय ही झाला़ परंतु अंमलबजावणी होत नसल्याने ठोस निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे़ त्यामुळे याबाबत होणाऱ्या बैठकीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे़ नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे़ मात्र त्यांच्या पगारात वाढ झाली नाही़ ती करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीची संधी, कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा, अनुकंपा तत्वावरील सेवा भरतीची ५ टक्के अट रद्द करावी, याप्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे़(प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या दालनांना टाळेजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत़ कर्मचारी संपावर असल्याने प्रमुख अधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते़ नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांना कार्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़ मात्र प्रमुख अधिकाऱ्यांच्या दालनाला मंगळवारी टाळे होते़
तहसीलदारही संपात सहभागी
By admin | Published: August 05, 2014 11:34 PM