कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विलास शिंदे यांना १५ जानेवारीला टाकळी येथील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी एक म्हणून कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
मात्र, या उपचारासाठी खर्च करण्याची शिक्षक शिंदे यांची आर्थिक परस्थिती नसून या उपचारादरम्यान येणारा सर्व आर्थिक खर्च हा तहसील कार्यालयामार्फत करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती गुरुकुल मंडळ जिल्हा संपर्कप्रमुख अशोक कानडे यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन मागणी केली होती.
या मागणीची तहसीलदार चंद्रे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित शिक्षकाच्या रुग्णालयातील खर्च कशा प्रकारे करता येईल, या संदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे मार्गदर्शन मागितले असून तसा पत्रव्यवहार देखील केला आहे. अशी माहिती अशोक कानडे यांनी दिली आहे. दरम्यान शिक्षक विलास शिंदे यांनी खासगी रुग्नालयात दोन-तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृतीत उत्तम सुधारणा झाली आहे. त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक शिंदे हे सध्या घरीच विश्रांती घेत आहेत.
...............
''लोकमत'' ने प्राथमिक शिक्षकांच्या समस्येविषयी, प्रश्नाविषयी वारंवार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांना प्रसिद्धी देउन वाचा फोडण्याचे काम केले आहे. तसेच आत्ताही शिक्षक विलास शिंदे यांच्या उपचारावर झालेला खर्च हा तहसील कार्यालयाने करावा, या शिक्षक संघटनेच्या मागणीचीही दखल घेतली आहे. त्यामुळे या लढ्यात निश्चितच मदत होणार असल्याची भावना शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक कानडे यांनी व्यक्त केली आहे.