शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ, दमबाजी करण्यात आली. सोमवारी (दि.११) रात्री १२.४५ वाजता मालपाणी नगर, संगमनेर येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी मंगळवारी (दि.१२) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तहसीलदार मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम थोरात (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मालदाड रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शहरानजीक असलेल्या मालपाणी नगर येथे तहसीलदार मांजरे वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री १२.४५ वाजता शुभम थोरात याने त्यांच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. त्यांच्या घराच्या दरवाजाची बेल वाजवून दारावर थापा मारून शिवीगाळ केली. त्यानंतर तहसीलदार मांजरे यांनी दरवाजा उघडला असता ‘तुम्ही माझा कॉल का घेतला नाही’ असे म्हणत त्याने पुन्हा शिवीगाळ तसेच दमदाटी केली. थोरात याने तहसीलदार मांजरे यांना दहा ते बारा कॉल केले होते. मात्र, तहसीलदार मांजरे झोपी गेल्याने ते कॉल उचलू शकले नाहीत. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत.