जामखेड : तालुक्यातील तेलंगसी, सावरगाव, जवळके ही गावे लवकरच पाणीदार होणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून या तीनही गावांमध्ये प्रत्येकी १७ किमी लांबीच्या अंतरावर ‘सलग समतल चर’ खोदाईचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात लांबीचा हा प्रकल्प आहे.
जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडून ते जमिनीत मुरले तर भूगर्भाची पाणीपातळी वाढीस लागणार आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावांच्या विहिरी, बोअरवेल, तळ्यांना पाणी राहणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष तर दूर होईलच मात्र वर्षानुवर्षे पडीक असलेल्या माळरानावरदेखील शेती फुलणार आहे.
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या ‘समृद्ध गाव घडवूया’ या अभियानांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओढा खोलीकरण, चारी जोड प्रकल्प, खोल सलग समतल चर, नदी खोलीकरण, जुन्या बुजलेल्या पोट चाऱ्यांची दुरुस्ती, चाऱ्यांचे खोलीकरण आदी कामांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
आता जामखेडच्या काही गावांत होणाऱ्या या सलग समतल चर प्रकल्पामुळे या भागाचे रूपडे पालटणार आहे. सीना व कुकडी प्रकल्पाच्या नियोजनातून जी गावे आतापर्यंत पाण्यापासून वंचित राहिली त्या गावांतील शेतकऱ्यांना आता आपल्या हक्काचे पाणी मिळू लागले आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी जागेवरच अडवून ते पाणी जिरवण्यासाठी सलग समतल चरची मुख्य भूमिका असणार आहे. जी गावे या प्रकल्पात स्वतःहून पुढाकार घेतील अशा गावांना पवार मदतही करणार आहेत. विशेष म्हणजे हे काम पाहून आणखी पाच गावेही या प्रकल्पात सहभागी होणार आहेत.
--
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, याच हेतूने जलसंधारणाची कामे आपण करणार आहोत. सलग समतल चर, ओढा खोलीकरण, माथा ते पायथा, बांध बंदिस्ती आणि त्याचबरोबर लोकजनजागृती हे जलसंधारणाचे सर्व प्रयोग राबवणार आहे.
-रोहित पवार,
सदस्य, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
--
दोन फोटो
२६ तेलंगशी, १
जामखेड तालुक्यातील तेलंगसी, सावरगाव, जवळके या गावात सलग समतल चराचे सुरू असलेले काम.