अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे सर्वत्र लाही लाही होत असून, हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांत नगरचा राज्यात दुसरा क्रमांक लागला आहे. सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस नगरमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.उन्हाळ्याचा पहिला महिनाही संपत नाही, तोच पा-याने चाळिशी ओलांडली असल्याने उर्वरित एप्रिल व मे महिन्यांत काय दशा होईल, याची कल्पना केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील भिरा येथे सोमवारी राज्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्शिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर नगरचा (४१ अंश सेल्सिअस) क्रमांक लागतो. उष्णतेच्या दाहकतेमुळे नागरिकांची लाहीलाही होत असून, उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
उष्माघातापासून सुरक्षेसाठी हे करा
तहाण नसली तरी पुरेसे पाणी घ्या.सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.प्रवास करताना सोबत पाणी घ्या. घर थंड ठेवा.पडदे, झडपा, सनशेड बसवा व रात्री खिडक्या उघड्या ठेवा.उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा.डोके, गळा, चेहºयासाठी ओला कपडा वापरा.अशस्त कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.ओआरएस, घरची लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक घ्या.जनावरांना सावलीत ठेवा. पुरेसे पाणी द्या.पंख्याचा वापर करा. थंड पाण्याने अंघोळ करा.
हे करू नका
दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.मद्यसेवन, चहा, कॉफी, तसेच कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहाइड्रेट होते.उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नका.पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.