अहमदनगर : मागील तीन दिवसांपासून उन्हाचा पारा अत्यंत वाढला असून, तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. शनिवारी पारा ४३ अंशावर पोहोचला होता. तर रविवारी दुपारी ४१ अंशावर पारा होता. अशा तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुपारी उन्हात फिरू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा जाणवलाच नव्हता. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ८ मेपर्यंत पावसाचे वातावरण होते. ८ मेच्या रात्रीही पाऊस झाला. त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा पावसातच जातो की काय, अशी परिस्थिती असतानाच ९ मेपासून अचानक उन्हाची तीव्रता एकदम वाढली. शुक्रवारी व शनिवारी ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान पोहोचले. शनिवारी तापमानाने उच्चांक गाठत ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली. ४० अंशाच्या वर तापमान गेल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा तीव्र उन्हात फिरणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.ही आहेत उष्माघाताची लक्षणे
भरपूर घाम येणे, त्वचा कोरडी किंवा गरम होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाची गती वाढणे, श्वसन दर वाढणे, जास्त तहान लागणे, डोकेदुखी होणे, स्नायू पेटके, शुद्ध हरपणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत....तर होऊ शकतो मृत्यू
उष्माघातामुळे मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना सूज येऊ शकते. मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. उष्माघातावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. उष्माघातामुळे अनेकदा मृत्यू ओढवल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.